जागतिक महिला वैज्ञानिक

गरूड झेप घेणाऱ्या जागतिक महिला वैज्ञानिक

आपले रोजचे जीवन पाहता आपण विज्ञानावर किती अवलंबून आहोत हे लक्षात येईल. रोजच्या उपयोगाच्या वस्तुंबाबत तर आपण आनंद व्यक्त करतोच पण त्यामागे कुणाचा मेंदू आहे? कुणाचे किती परिश्रम आहेत हे विचारात घेतले जात नाही. पूर्वी पेक्षा आजचे जीवन सुखाचे झाले आहे. लहान सहान वस्तु तर ठिकच पण मोठे मोठे शोधही वाचून थक्क होतो, आनंद व्यक्त करतो पण शोधाच्या प्रयत्नाबद्दल अनभिज्ञ असतो. क्वचित वाचनात आले तरी वाचून विसरून जातो. सोय, गरज, चैन, करमणूक ह्या बरोबरच कृत्रिम उपग्रह, वैद्यक शास्त्र हे सर्व ह्या वैज्ञानिक शोधांमुळेच शक्य झाले आहे, हे मान्य करून कौतुकही करतो, पण त्याचबरोबर शोधकांच्या परिश्रमांबद्दल आपण तितके जागरूक नसतो. जाणून घेण्याची इच्छाही आपल्याला क्वचितच होते. अपवाद इतर संशोधक आणि काही अंशी तशी धडपड करणारे भावी संशोधक!

मात्र प्रा. प्रकाश माणिकपुरे यांनी अतिशय मेहनत घेऊन जागतिक प्रसिद्धी मिळविणाऱ्या वैज्ञानिक महिलांच्या प्रयत्नांची माहिती मिळवून हे पुस्तक लिहिले आहे आणि नचिकेत प्रकाशनाने ते उत्तम प्रसिद्ध केले आहे. ह्या पुस्तकांतून अशा स्त्रियांची व त्यांच्या प्रयत्नांची त्यांच्या यशाची बहुमोल माहिती आपल्याला मिळते आणि तीही 19 व्या शतकापूर्वीच्या म्हणजे (इ.स. 1805) ज्यावेळी स्त्रियांचे विश्व फक्त चूल आणि मूल एवढेच होते. विज्ञान तर फारच दूरची गोष्ट! 1805 मध्ये थोडी सुरवात झाली, मग आवड निर्माण होत गेली आणि 1810 मध्ये केमिस्ट्री हा एक उपयुक्त ग्रंथ लिहिला गेला. लिहणारी स्त्री होती जीनी मार्सेट! जागतिक पहिली वैज्ञानिक! आणि मग अमेरिकेतील महिला विज्ञानाच्या प्रेमाने झपाटल्या गेल्या. पुढे त्यांना प्रोत्साहन मिळालं ते 1920 मध्ये जेव्हा जीवरसायन शास्त्रज्ञ डॉ. एफ.जी. हापकिन्स ह्यांनी आपली प्रयोगशाळा सर्व महिलांना उपलब्ध करून दिली. डॉ. च्या ह्या सौजन्यामुळे स्त्रियांनी झपाटल्यागत अर्ध्या जागा दहा वर्षात व्यापून टाकल्या आणि मग महिला उच्च दर्जाच्या वैज्ञानिक झाल्यानंतर मग त्यांना अनेक शास्त्रज्ञांची मदत मिळत गेली.

परंतु ह्या पूर्वीही काही स्त्रियांनी विज्ञानात क्रांती केल्याची माहिती मिळते. काही जणी प्राध्यापक झाल्या. इ.स. 1794 मध्ये एलिझाबेथ फुल्हेम यांनी विज्ञान मते प्रकाशित केली. ह्या त्यांच्या ग्रंथामुळे इ.स. 1810 मध्ये त्यांना विज्ञान संस्थेचे सन्माननीय सदस्यत्व मिळवून दिले. मॅडम इडाफ्रियुड ह्यांनी त्यांचा एक पाय निकामी झाल्यावरही रसायनशास्त्र प्राध्यापिका म्हणून नोकरी केली शिवाय विज्ञान संशोधन करून 1905 मध्ये एक अनमोल ग्रंथ लिहून (दि स्टडी ऑफ केमिकल कंपोझिशन) तो जगाला समर्पण केला आणि अजरामरत्व मिळविले. काही स्त्रियांनी तर त्यावेळी स्वत:ला मिळालेले तेरा लाख डॉलर स्त्रियांच्या विज्ञान विकास संस्थांना दान म्हणून दिले.

महिलांच्या खगोल शास्त्रातील झेप बद्दल वाचूनही आपण थक्क होतो. 1818 ते 1921 मधील संशोधनामुळे आजही स्त्रिया खगोलशास्त्रज्ञ म्हणून अमर आहेत.

वैद्यकीय व औषधी निर्माणशास्त्रात देखील महिला वैज्ञानिक होऊन गेल्या. बहुमानही मिळविले, समाजालाही फायदा झाला. सुतिकागृह, दवाखाने निर्माण झाले. 1944 मध्ये ज्यू महिला जरटूड एलियन ह्यांनी रक्त कर्करोगावर औषध शोधून काढले आणि ते लहान मुलांसाठी आज देखील वापरले जाते. आपल्या भारतातील पहिल्या डॉ. आनंदीबाई जोशी अकाली गेल्या नसत्या तर त्यांनीही उत्तम काम केले असते.

ह्यानंतर आपल्याला वाचायला मिळते नोबेल पुरस्कार मिळवलेल्या स्त्रियांची माहिती. 2009 मध्येच 5 महिलांनी नोबेल पारितोषक मिळविले आहे, हे आपण वृत्तपत्रामधून वाचतोच. ह्या पुस्तकातून त्यांच्या परिश्रमाची माहिती मिळते. लक्षात राहते ती दोन पुरस्काराची मानकरी मारी क्युरी ची जिद्द! कुटुंब नियोजनाची पहिली प्रवर्तक मारी स्टोप्स.

अमेरिकन प्राणी शास्त्रज्ञ आणि पर्यावरण तज्ज्ञ रेचल कार्सन. निसर्ग व जीवसृष्टी बद्दल आईकडून प्रेमाचा ठेवा मिळाला आणि सजीव सृष्टीचे सौंदर्य वाचविण्याचा सतत प्रयत्न केला. डी डी टी एक विषारी फवारणी आणि त्याचा भयानक पैलू म्हणजे ते एका प्राण्याकडून दुसऱ्या प्राण्याकडे जाते आणि अन्नसाखळीत प्रवेश करते. संपूर्ण जीवसृष्टीवर कसा घातक परिणाम करतात, याचे शास्त्रीय विवेचन केले. परंतु त्यांना अकाली मृत्यू आला.

मारी क्यूरीची लेक, जावई आणि एकूणच क्यूरी घराणे नोबेल पुरस्कारासाठी प्रसिद्ध आहेत.

महिला अणुवैज्ञानिक, रसायन शास्त्रज्ञ, गणिती, अवकाश विज्ञानात झेप घेणारी, गरुड भरारी घेणारी, जीवशास्त्रज्ञ, पदार्थ विज्ञानातील नोबेल मानकरी, वैद्यक शास्त्रज्ञ, खगोल वैज्ञानिक, संपूर्ण जगाचे प्रेरणास्त्रोत अशा एकूण 35 स्त्रियांचे कर्तृत्व वाचायला मिळते. जाणारी व्यक्ती परत येत नसते, पण त्यांचे कार्य तर पुस्तकाद्वारे अजरामर होत असते.

लेखक लिहित असतो, वाचक तृप्त होतो. दैनिकांतून वेळोवेळी प्रसिद्ध झालेल्या लेखांचे संकलन ह्या पुस्तकातून वाचायला मिळते. पुढच्या पिढीला एकत्रच सर्व माहिती मिळून फायदा मिळतो, म्हणून अशा पुस्तकांची गरज असते.

नचिकेत प्रकाशनाने आपल्या विज्ञान ज्ञानयज्ञात या अनमोल संग्राह्य पुस्तकाच्या रूपाने एक सुंदर भर घातली आहे. लक्षवेधी मुखपृष्ठ आणि दर्जेदार, देखणी निर्मिती ही नचिकेत प्रकाशनाची वैशिष्ट्ये याही पुस्तकात कायम आहेत. यासाठी लेखक आणि प्रकाशक दोघांचे अभिनंदन.
विभावरी शेंबेकर
12अ, टिळक नगर, नागपूर
24 योगक्षेम ले-आऊट, स्नेहनगर, वर्धा रोड, नागपूर-15, भ्र. 9225210130

Hits: 80