नक्षत्र मैत्री

निरभ्र आकाशातील असंख्य चांदण्यांचे द्रुष्य अतिशय मनोहारी वाटते. या लुकलुकणाऱ्या चांदण्यांबद्दल सर्वांच्याच मनात मोठे कुतुहल असते. उंच आकाशात चमकणारे हे हिरे असल्याचे बालकांना वाटते, तर कधीही नष्ट न होणारी ही नक्षत्रे असल्याचे मोठ्या माणसांची कल्पना असते. नक्षत्रांची नावे अनेकांना माहीत असतात. परंतु ती नेमकी कशी दिसतात? आकाशात कुठे आणि केव्हा दिसतात, हे माहीत नसते. तसेच त्यांना अशी ठराविक नावे का देण्यात आली? त्याच्यामागे काही कथा आहेत की काय? असे अनेक प्रश्न सर्वांच्या मनात असतात. असल्या विविध प्रश्र्नांची समर्पक उत्तरे नक्षत्र मैत्री या लहानशा पुस्तकात प्रसिद्ध वैज्ञानिक खगोल अभ्यासक आणि साहित्याचे व्यासंगी डॉ. पुरूषोत्तम विश्वनाथ खांडेकर यांनी अत्यंत सरळ सोप्या भाषेत दिली आहेत.

आकाशाचे अवलोकन करताना एकावेळी एका लहानशा भागावरच नजर खिळलेली असते. त्या भागात दिसून येणाऱ्या आकाशस्थवस्तू पाहून आपण त्या भागाचे द्रुष्य पाहण्याचा अनुभव घेतो. म्हणून त्या भागाची सविस्तर माहिती कथन करणाऱ्या मजकुराला त्या भागावरील प्रकरण हा नेहेमी वापरण्यात येणारा शब्द न वापरता लेखकाने द्रुष्य हा शब्द वापरून पुस्तकाचे वेगळेपण दाखविले आहे. अशी वेगवेगळी तेरा द्रुष्ये दाखवून संपूर्ण आकाशाची माहिती या पुस्तकातून मिळते. वैज्ञानिक माहितीच्या जोडीला विविध नक्षत्रांविषयीच्या प्राचीन कथा आणि त्यांच्या बद्दलच्या काव्यपंक्ती जागो जागी दिल्याने पुस्तक उद्‌बोधक आणि मनोरंजक झाले आहे.

नक्षत्रांमधील तारे, दीर्घिका, तेजोमेघ इत्यादि वस्तू अतिशय दूरस्थ आहेत. त्या प्रचंड मोठ्या आणि अतिशय उष्ण असल्याचे वाचून ही प्रचंड मोठी अंतरं वस्तूमान, तापमान इत्यादी नेमकी कशी ठरविली जातात, हा प्रश्र्न वाचकांपुढे उभा राहातो. पुस्तकात वेगळी परिशिष्ठे जोडून लेखकाने या प्रश्र्नांना समर्पक उत्तरे दिली आहेत. पुस्तकाला उत्तम रंगीत मुखपृष्ठ दिले आहे. मजकुरातील माहिती स्पष्ट करणाऱ्या योग्य आकृत्या आणि चित्रे दिली असल्याने पुस्तक अधिकच आकर्षक झाले आहे.

डॉ. मधुकर आपटे

शीर्षक : नक्षत्र मैत्री
लेखक : डॉ.पु.वि.खांडेकर,
पृष्ठ संख्या 61 : किंमत : 60/- रू
प्रकाशक : नचिकेत प्रकाशन, नागपूर

Hits: 42