गोविंद पांडुरंग कंटक
गोविंद पांडुरंग कंटक - MA B.Ed
निवृत्त उपमुख्याध्यापक विद्यामंदीर प्रशाला, मिरज
गोविंद पांडुरंग कंटक यांचा सांगली जिल्ह्यातील एका खेड्यात जन्म झाला. घरची परिस्थिती अत्यंत गरीबीची. वडील मिरजेच्या भारतभूषण शाळेत शिक्षक होते. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण F.Y B.Sc पर्यंत केल्यानंतर शिक्षक म्हणून कामास सुरवात. पूर्वी शिक्षक जून ते एप्रिल पर्यंत नोकरीस असत. एप्रिलला शिक्षकाची नोकरी खंडीत होत असे. पगार १० ते १२ रूपये होता. कोणत्याही प्रकारचे स्थैर्य नोकरीत नव्हते. स्वाभिमानी स्वभावामुळे संस्थाचालकाकडे नोकरीची लाचारी न केल्यामूळे ११ शाळात नोकरी करावी लागली. उत्तम अध्यापन, प्रचंड बुध्दीमत्ता व कल्पकता, सतत धडपडण्याची वॄत्ती परंतू स्वभाव थोडा तापट. यामुळे असंख्य अडचणीतून प्रवास. विद्यामंदीर प्रशाला, मिरज येथे नोकरीस आल्यानंतर संस्थेने त्यांची कायम पदावर नियुक्ती केली. उपशिक्षक, पर्यवेक्षक व उपमुख्याध्यापक म्हणून कार्य केले. नोकरीच्या काळात BA, MA मराठी ह्या पदव्यांचे शिक्षण बाहेरून केले व उच्च श्रेणी मिळवली. सांगलीच्या B.Ed कॉलेजमधून B.Ed कोर्स पूर्ण केला व प्रथम क्रमांकाने पास झाले. ह्या वेळेस देखील ते नोकरी करत होते. मराठी विषयाचे उत्तम अध्यापन करीत असत. परंतू खरी आवड विज्ञानाची.
त्यामुळे सतत वाचन चिंतन मनन व प्रयोग करण्याची धडपड यांतूनच ते उत्तम विज्ञान शिक्षक बनले. दिवसातील १८ तास ते शाळेत रमत. प्रयोगशाळा हेच त्यांचे घर. ५ वी ते १२ वी पर्यंत सर्व वर्गांना आवडीने ते अध्यापन करीत असत. शाळेमध्ये डॉ. भाभा विज्ञान मंडळाची स्थापना केली व मंडळाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडविले. त्यांना विज्ञान संशोधक घडविले. तालुका, जिल्हा, राज्य राष्ट्रीय पातळीवर विज्ञान प्रदर्शनात अनेक पुरस्कार त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना मिळवून दिले. त्यांचे मार्गदर्शन अत्यंत मोलाचे होते. शाळेतील शिक्षकांना ते विविध विषयाचे मार्गदर्शन करीत. शैक्षणिक संशोधन प्रकल्पांना मार्गदर्शन करीत. वेळापत्रकाची पुनर्रचना, शालेय दिनदर्शिका, गुणवत्ता प्रकल्प पाठ्यपुस्तकांचे परीक्षण, ९ वी भूमिती पाठ्यपुस्तकांचे परीक्षण, वैज्ञानिक प्रात्यक्षिकांच्या माध्यंमातून विज्ञानाचे अध्यापन अशा शिक्षकांनी सादर केलेल्या प्रबंधास त्यांनी मार्गदर्शन केले. हे प्रबंध राज्य व राष्ट्रीय पातळीपर्यंत निवडले गेले व शिक्षकांना पुरस्कार मिळाले.
विज्ञान कथा, वैज्ञानिक प्रयोग, वैज्ञानिक उपकरणे यासंबंधीचे मार्गदर्शन महाराष्ट्रातील असंख्य शाळेत कंटक सरांनी केले. मिरजेत बालबिद्यार्थ्यांची आषाढी दिंडी काढण्यात त्यांचा मोठा वाटा होता. स्वाध्याय प्रकल्प राबवून विद्यार्थ्यांना त्यांनी गुणवान बनविले. मराठी विज्ञान प्रबोधिनीचे ते अध्यक्ष होते. या संस्थेचा आदर्श वैज्ञानिक चा पुरस्कार त्यांना मिळाला आहे. निवृत्तीनंतर सावरकर प्रतिष्ठान संचालीत प्रज्ञा प्रबोधिनी प्रशालेत त्यांनी मुख्याध्यापक म्हणून काम केले. स्कॉलरशिप MTS (महाराष्ट्र प्रज्ञाशोध) NTS (राष्ट्रीय प्रज्ञाशोध) या परीक्षांचे ते उत्तम मार्गदर्शक आहेत. विज्ञान प्रदर्शनाचे संयोजक व परीक्षक त्यांनी काम पाहिलेले आहे. सध्या त्यांचे वय ८३ वर्षे आहे. अजून देखील ते मार्गदर्शक म्हणुन काम करतात. ते अविवाहीत आहेत.