घन कचरा व्यवस्थापन

प्रास्तविक
वाढत्या शहरीकरणामुळे पर्यावरण प्रदूषणाच्या ज्या समस्या निर्माण झाल्या आहेत, त्यात घन कचऱ्याचे एकत्रीकरण व त्याची विल्हेवाट ही एक मोठी खर्चाची तसेच पर्यावरणाच्या दृष्टीने फार महत्वाची समस्या बनली आहे. लोकसहभागाने या समस्येवर तोडगा काढणे ही एक काळाची गरज आहे. यादृष्टीने संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियान ही अतिशय स्वागतार्ह योजना शासनाने सुरू केली आहे. त्यात सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेणे आवश्यक आहे. असे झाले तर ही समस्या, समस्या न राहता पर्यावरण रक्षणाबरोबरच ते एक उत्पन्नाचे साधन बनू शकेल.
घनकचरा निर्मिती

घन कचऱ्याची निर्मिती घराघरातून होत असल्याने गोळा होणाऱ्या घनकचऱ्याचे प्रमाण वा त्याचा दर्जा यावर नियंत्रण ठेवता येत नाही. परिणामी त्याची साठवण, वाहतूक व्यवस्था वा त्यावरील प्रक्रिया यांचे डिझाईन करण्यासाठी सांख्यिकी पद्धतींचा वापर करावा लागतो. साहजिकच ही व्यवस्था सर्व परिस्थितीत कार्यक्षम राहण्यासाठी अधिक लवचिक व सुसज्ज ठेवणेे आवश्यक ठरते. यासाठी लागणारी साधन सामुग्री, मनुष्यबळ व आर्थिक तरतूद बहुतेक नगरपालिकांच्या आवाक्याबाहेरची गोष्ट असते. त्यामुळे कचरा पेटीतून भरून वाहणे, तेथेच कुजून दुर्गंधी पसरणे, पाण्यात मिसळल्याने पाणी दूषित होणे व शहरी परिसर अस्वच्छ दिसणे या गोष्टी सर्वसामान्य झाल्या आहेत. गोळा केलेला कचराही शहराबाहेर उघड्यावर टाकून दिल्याने तेथेही मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत असलेले बहुतेक ठिकाणी दिसून येते.
घन कचरा स्वत: वाहून जात नाही. तो उचलून न्यावा लागतो यामुळे प्रदूषण त्या जागीच मर्यादित राहत असले तरी न वापरातील सर्व जागा हळुहळू कचऱ्याने व्यापल्या जातात आणि प्रत्यक्ष कृतीशिवाय स्वच्छता होत नाही. केवळ कायदे करून वा नगरपालिकेची कार्यक्षमता वाढवून या समस्येचे निराकरण करता येणार नाही. याउलट लोकांची मानसिकता बदलली आणि त्यांनी जाणीवपूर्वक यात सहभाग घेतला तर एरवी अशक्य व खर्चिक वाटणारी ही योजना अत्यंत कमी खर्चात प्रभावीपणे यशस्वीपणे राबविता येईल.
घनकचरा निर्मिती

शहर घनकचरा निर्मिती
दिल्ली ४६०० मे. टन
चेन्नई ३५०० मे. टन
मुंबई ५००० मे. टन
पुणे १५२७ मे. टन
नागपूर  ११०० मे. टन
नाशिक ४३५ मे. टन
कोल्हापूर २५० मे. टन
सांगली ५५ मे. टन

लोक सहभाग
शासनपुरस्कृत संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियानातून लोक चळवळ उभी राहिली तर या अवघड समस्येवर प्रभावी उपाययोजना करता येणे शक्य आहे.
लोक सहभागातून खालील गोष्टी साधता येतील
  • प्रदूषणकारक प्लॅस्टिक क्रॅरी बॅग ऐवजी कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापर करणे.
  • कचरा पेटीतच टाकणे व बाहेर सांडणार नाही याची काळजी घेणे.
  • कचरा निर्मिती कमी करण्यासाठी वस्तूंचा पुर्नवापर करणे.
  • कुजणारा, न कुजणारा, विषारी व घातक कचरा एकत्र न करता वेगवेगळया पिशव्यात वा डब्यात ठेवणे.
  • व्यापारी पद्धतीच्या पुर्ननिर्माण प्रक्रियेसाठी कागद, प्लॅस्टिकच्या पिशव्या, काच, धातू एकत्र करून विकणे.
  • कुजणारा कचऱ्याचे घरातच जीवाणू संवर्धन वा गांडूळ खत पद्धतीचा वापर करून खत तयार करणे व घराच्या बागेसाठी वापरणे वा बंद पिशवीतून विकणे.
  • आपल्या भोवतालचा परिसर स्वच्छ ठेवणे.
  • जनजागृती अभियानात सक्रीय सहभाग घेणे.
  • नगरपालिकेच्या कामावर नजर ठेवून कचरा साठणे वा अन्य हानीकारक घटनांकडे प्रशासनाचे लक्ष वेधणे.
  • नगरपालिकेच्या नियमांचे पालन करणे व स्वच्छता कार्यास हातभार लावणे.
घनकचरा प्रक्रिया पद्धती
शास्त्रीय जमीनभराव पद्धती
  • खोलगट जमिनीवर कचरा व मातीचे थर टाकून रोलींग करणे
  • सर्वात सोपी व कमी खर्चाची पद्धत
  • जळावू वायू मिळण्याची योजना शक्य
  • पडीक जमिनींचे सुपिक जमिनीत रुपांतर
प्रदूषणाचा धोका
  • नव्या नियमांनुसार या पद्धतीच्या वापरावर कडक निर्बंध
सेंद्रीय खत निर्मिती
  • कचरा वर्गीकरण आवश्यक
  • जीवाणु वा गांडुळांची वाढ करून कचऱ्याचे खतात रूपांतर
  • किफायतशीर परंतु अधिक देखभालीची आवश्यकता
पूर्ण ज्वलन पद्धती
  • खर्चिक परंतु प्रभावी पद्धत
  • घातक विषारी तसेच वैद्यकीय कचऱ्यासाठी आवश्यक
  • तांत्रिक संकल्पन योग्य असणे आवश्यक
विकेंद्रीत कचरा प्रक्रिया
  • घरगुती वा छोट्या प्रमाणावर खतनिर्मिती
  • वाहतूक खर्चात बचत आणि खताचा स्थानिक उपयोग शक्य
  • अधिक किफायतशीर व उपयुक्त
  • लोकजागृती व त्यांचा सक्रीय सहभाग आवश्यक
खर्चाचा तपशील
  • कचरा गोळा करणे ६४३ रू. प्रति टन
  • कचरा वाहतूक २४० रू. प्रति टन
  • कचरा प्रक्रिया व विल्हेवाट २५ रू. प्रति टन
वरील आकड्यांवरून असे दिसून येईल की घन कचरा योजनेच्या खर्चाचा फार मोठा हिस्सा कचरा गोळा करण्यात खर्च होतो. त्या मानाने कचरा प्रक्रिया व विल्हेवाटीसाठी अगदी कमी खर्च केला जातो. कचऱ्यावर योग्य प्रकारे प्रक्रिया करण्यासाठी सध्या फारसे लक्ष दिले जात नाही यामुळे योजनेच्या खर्चाचे वरील कोष्टक प्रमाणभूत मानता येणार नाही. तरीदेखील कचरा गोळा करणे व त्याची वाहतूक हाच योजनेचा मुख्य खर्च आहे असे म्हटले तर वावगे होणार नाही.
गोळा झालेला कचऱ्याचे खत बनविल्यास व्यावसायिक फायद्याचा उद्योग होऊ शकतो हे लक्षात आल्याने अनेक खासगी संस्था स्वखर्चाने कचरा प्रक्रिया प्रकल्प राबविण्यास पुढे येत आहेत. मात्र कचरा गोळा करण्याचे खर्चिक काम नगरपालिकेस करावे लागत असल्याने अशा योजनांचे योग्य मूल्यमापन होणे जरुरी आहे. नगरपालिकेनेच हे काम हाती घेतले तर नगरपालिकेस ही योजना फायद्याची ठरू शकेल.

 

Hits: 63