स्वप्न हरित क्रांतीचे (निबंध -३)

गेली कित्येक वर्षे प्रदुषणाने आमची पाठ सोडली नाही. एक दिवस मनात एक विचार आला की, जर आपणास प्रदुषण रहीत वायु मिळवायचा असेल तर समाजातील प्रत्येक व्यक्तीने श्रमदान केले पाहिजे. तरच हे ‘ हरित नगरीचे स्वप्न’ साकारणार आहे. पण हे कुणीच मनावर घेतले नाही. माझे हरित नगरीचे स्वप्न अपुरेच राहील. त्यातील एका व्यक्तीने मला धीर देत विचारले की तुझी हरित नगरीची कल्पना सांगशील का? मी होकार देत सांगितले की, "माझ्या स्वप्नातील हरितनगरी" अशी की सर्वत्र हिरवीगार दाट झाडी त्यात खेळत असलेले प्राणी त्यांच्या तोंडावरील समाधान मला पाहायचे आहे. या सर्व प्राण्यांच्या वस्तीत मी ‘नंदनवन’ करेन. त्या ठिकाणचा परिसर पाहिल्यावर मानवाला समाधान या शब्दाचा अर्थ समजायला हवा. कवी केशवसुत म्हणतात -


"असे सुंदरता अढळ जरी कोण !
तरी करी ती सृष्टीत मात्र वास !!
पहा मोहील सर्वदा ती तुम्हांस !!"

अशा नंदनवनात छोटेसे तळे असावे. नेहमीच्या बंदिस्त जीवनापासुन दुर जाण्यासाठी माणूस विरंगुळा शोधत असतो. असा आनंद त्यांना निसर्गाच्या सहवासात मिळतो. निसर्गाच्या सानिध्यात त्याच्या सर्व व्यथा, विवंचना विसरल्या जातात. दिवसाने कंटाळलेले मन पुन्हा ताजेतवाने होते. म्हणूनच कवी अनिल म्हणतात, ‘ह्रद्यावरची विचारांची धुळ निवळत जाते, अशा तळ्याच्या काठी मला बसुन रहावे वाटते’. निसर्ग माणसाला अनेक गोष्टी शिकवतो. तो त्याला कृत्रिमतेकडून अकृत्रिमतेकडे नेणारी वाट दाखवतो. झाडांवरील फुले मानसाला हसायला शिकवतात. तर झाडे माणसांना जगायला शिकवतात. प्रत्येक झाड काहीतरी संदेश देत असतं. झाडाच्या प्रत्येक डाहळीवरती पान, फुल कसे जगावे हा ध्यास घेऊन उभे असते. आज भौतिक सुखा पाठीमागे लागलेला माणूस निसर्गावर विजय मिळवु पाहत आहे. तरी निसर्ग मानवाला प्रेम देण्याचे प्रमाण कमी केले नाही. परंतु माझ्या स्वप्नातील हरित नगरी अशी की त्या ठिकाणी ना भांडण ना तंटा. सर्व वातावरण अतिशय सुखद त्या ठिकाणी सर्व बाजूला

हिरवे- हिरवे गार गालीचे
हरित तृणांच्या मखमालींचे

माझ्या स्वप्नाच्या हरितनगरीत रोजचा सूर्य नविन काहीतरी घेऊन येतो. या करीता बंकिमचंद्र चटर्जी यांनी भारत मातेचे वर्णन ‘सुजलाम् सुफलाम्’ असे केले. निळे- निळे आकाश, लुकलुकणारे तारे, शितल शशी, तृप्त रवी, छोट्या टेकड्या, उंच पर्वत, झरझर झरणारे झरे, खळखळणाऱ्या नद्या, फसफसणारे सागर ही निसर्गाची रुपे माझ्या स्वप्नातील हरित नगरात पहायला मिळतात. हे नंदनवन पाहण्यासाठी माझे डोळे अतुर आहेत. जी व्यक्ती ही माझी कल्पना सत्यात आणेल ती व्यक्ती खरोखरच असामान्य असेल कारण इतका मोठा प्रकल्प करण्यास अजुन केंद्रशासनाला शक्य झाले नाही. निसर्गाला अनन्यसाधारण महत्व आहे.

----दिगंबर स. पवार, इयत्ता दहावी, विद्यामंदिर प्रशाला, मिरज

Hits: 45