ग्रीन बिल्डिंग

ग्रीन बिल्डिंगची आवश्यकता
वाढत्या औद्यौगीकरणामुळे मोठ्या शहरातील लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. या लोकसंख्येचा ताण शहरातील निवासव्यवस्था, रस्ते, पाणीपुरवठा, वीज यासारख्या पायाभूत सुविधांना सहन करणे अशक्य झाले आहे.

शहरातील बहुतेक सर्व मोकळ्या जागा, क्रीडांगणे, बागा व जुन्या इमारती यांच्याजागी नव्या टोलेजंग इमारती उभ्या रहात आहेत. एका जुन्या एक मजली इमारतीच्या जागी बहुमजली इमारत झाली तेथे राहणाया लोकांची संख्या कित्येक पटीनी वाढते. साहजिकच त्यांची पाण्याची गरज त्याचप्रमाणात वाढते. मात्र पाणीपुरवठ्याचा नळ मोठा करता येत नाही. कारण तो शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेतील एक छोटा भाग असतो. त्यामुळे मोठ्या व्यासाचा नळ बसविला तरी पाणीपुरवठा वाढू शकत नाही. जी गोष्ट पाण्याची तीच सांडपाणी वाहून नेणार्‍या गटारांची वा नळांची. पाणी पुरवठ्यासाठी बोअर वेल, टाकी व पंपाची व्यवस्था करता येते मात्र तयार होणारे सांडपाणी शहराच्या मलजल व्यवस्थेत सोडणे बहुधा शक्य होत नाही. कचरा संकलनाचीही वेगळी व्यवस्था करावी लागते. नव्या इमारतींच्या किंमती अधिक असल्याने त्यात राहणाया लोकांचे जीवनमानही उच्च असते. त्यांच्याकडे स्कूटर व मोटार वाहने असतात. त्यासाठी वाहनतळाची व्यवस्था करावी लागते. रस्त्यावरील वाहतुकही वाढते. रस्ता अधिक रुंद व जास्त टिकावू करावा लागतो. अधिक विजेची गरज भागविण्यासाठी उच्च दाबाच्या तारा व ट्रॅन्स्फ़ार्मर बसवावे लागतात.

एका इमारतीच्या बाबतीत असे होत असेल तर शहरात ठिकठिकाणी अनेक इमारतींचे असे रुपांतर झाल्यास शहराची सर्व सुविधा यंत्राणाच कोलमडून पडते. याशिवाय अनेक जुन्या इमारती पाडण्याचे वा नवीन बांधण्याचे काम चालू असल्याने ट्रकांची वाहतूक, जुने नवे बांधकाम साहित्य व कामगारवस्ती यांचाही ताण शहर व्यवस्थेवर पडतो. शहरातील लोकसंख्या वाढते तशी जीवनावश्यक वस्तूची गरजही वाढते. ती पुरविण्यासाठी मोठी दुकाने, मॉल यांचीही त्यात भर पडते. करमणूक व इतर सुखसोयीही आहे त्या जागेत निर्माण केल्या जातात. परिणामी शहराचे मुळचे रूप नष्ट होऊन त्याला कांक्रीटच्या जंगलाचे रूप येते.

बिल्डिंग व्यवसायात वाढ झाली असली तरी बांधकाम व्यावसायिक इमारतीच्या दिखाऊपणास जास्त महत्व देताना दिसतात. त्यामुळे गरज नसताना किंवा इमारतीतील पर्यावरणावर प्रतिकूल परिणाम होईल अशा रचना करताना आढळतात. यामुळे एअर कंडिशनर, प्रकाशासाठी जास्त ऊर्जा लागणारे दिवे, घातक वायू उत्पन्न करणार्‍या अंतर्गत सजावटीच्या वस्तू यांचा वापर केलेला आढळतो. त्यामुळे इमारतीतील पर्यावरण दूषित होते ऊर्जेसाठीच्या खर्चात वाढ होते व शहराच्या सेवासुविधांवरही अतिरिक्त ताण पडतो. यासाठी पर्यावरणपूरक इमारत म्हणजेच ग्रीन बिल्डिंग बांधण्याविषयी लोकशिक्षण व जागृती अभियान आवश्यक आहे.

ग्रीन बिल्डिंग संकल्पना

• सौरऊर्जेचा उष्णता व प्रकाश मिळविण्यासाठी वापर,
• नैसर्गिक वायुवीजन
• निर्मितीसाठी कमी ऊर्जा लागणार्‍या तसेच पर्यावरणास पूरक ठरणार्‍या वस्तूंचा बांधकामात वापर
• पाण्याच्या व ऊर्जेच्या वापरात काटकसर
• घरातील हवेचा दर्जा योग्य राखणे
• पर्जन्य जलसंधारण
• सांडपाण्याचे शुद्धीकरण व पुनर्वापर, घन कचर्‍यापासून खत वा बायोगॅस

ग्रीन बिल्डिंगच्या कल्पनेला अधिक चालना मिळावी यासाठी अमेरिकन ग्रीन बिल्डिंग कौंसिलने इमारतीचा पर्यावरणविषयक दर्जा निश्चित करण्यासाठी Leadership in Energy and Environmental Design (LEED) गुणांकन पद्धत तयार केली आहे.
लीड गुणांकन पद्धत

• २६-३२ गुण लीड प्रमाणित बिल्डिंग
• ३३- ३८ गुण सिल्व्हर दर्जाची बिल्डिंग
• ३९- ५१ गुण गोल्ड दर्जाची बिल्डिंग
• ५५-६९ गुण प्लॅटिनम दर्जाची बिल्डिंग

सूर्यप्रकाश
भारत उत्तर गोलार्धात असल्याने सूर्याचा मार्ग दक्षिणेकडे झुकलेला असतो. म्हणजेच मध्यान्ही स्थानीय अक्षांशाएवढा सूर्य दक्षिणेकडे कललेला असतो. साहजिकच सूर्यशक्तीवर पाणी गरम करणारी यंत्रणेचे तोंड दक्षिणेकडे असते. मात्र दक्षिणेकडे खिडकी असल्यास जास्त उष्णता घरात येते. यासाठी दक्षिण बाजूस खिडकी न ठेवता ती उत्तरेस ठेवणे योग्य असते. वर्षात सूर्याचा मार्ग बदलत असल्यामुळे दिवसभरात जास्तीत जास्त ऊर्जा मिळविण्यासाठी सौरऊर्जा साधनांची दिशा बदलावी लागते.

सौरचूल व सौरशक्तीवर पाणी तापविण्याची यंत्रणा आता सर्वांच्या परिचयाच्या झाल्या आहेत तरी त्यांचा वापर अजून फार कमी आहे. मोठी हॉटेल्स, होस्टेल्स, दवाखाने व अपार्टमेंट्स यांच्यासाठी पॅराबोलिक सोलर कुकर वा आंतरगोलीय संग्राहकांचा वापर करता येतो.

सोलरपॅनेल वापरून सौरशक्तीचे विजेत रुपांतर करता येते. स्टोअरेज बॅटरीत ही वीज साठवून रात्री प्रकाशासाठी वा पंख्यांसाठी या ऊर्जेचा उपयोग करता येतो. पवनचक्की व सौरऊर्जा यांचा एकत्रित उपयोग केल्यास इमारतीमधील विजेची गरज भागवून अतिरिक्त वीज ग्रिडला पुरवता येणे शक्य आहे.
घरात सूर्यप्रकाशाचा जास्तीतजास्त वापर होण्यासाठी छ्परामध्ये काचेची कौले, दुधी प्लॅस्टीकचे पत्रे, आरसे, भिंगे यासारखी विविध प्रकाश उपकरणे वापरून घरात कोठेही नैसर्गिक सूर्यप्रकाश पोहोचविणे आता शक्य झाले आहे. असा सूर्यप्रकाश कमी तपमानाचा व अधिक आल्हाददायक असतोच पण मुख्य म्हणजे यामुळे विजेच्या खर्चात खूपच बचत होते. मोठ्या व्यावसायिक ऑफिसेसमध्ये असा कमी तपमानाचा सूर्यप्रकाश विजेच्या दिव्यांऐवजी वापरल्यास शीतकरणाची गरज कमी होऊन खर्चात बचत होते.

सूर्याच्या उष्णतेपासून घराचे संरक्षण
सूर्यप्रकाशात असणार्‍या घराचा पृष्ठभाग आवश्यकतेनुसार उघडता व झाकता येण्याची सोय केलेली असते. पूर्वी घरांच्या भिंती जाड असत व त्यामुळे आपोआपच उष्णता राखण्यास मदत होत असे. बाहेरच्या खिडक्या व दारे यातून सूर्यप्रकाश सरळ आत येतो व आतील उष्णता वाढते.

खिडकी छतालगत उंचावर असल्यास असा परिणाम अधिकच जाणवतो. यासाठी खिडक्या खालच्या बाजूस ठेवून त्यावर पूर्ण सावली पडेल अशा रीतीने खिडक्या व दारांवरील कनातीची रूंदी ठरवावी लागते. तसेच घराच्या आत येणारा सूर्यप्रकाश सरळ न येता परावर्तित होऊन तो छताकडे जाईल व तेथून सर्वत्र पसरेल अशी योजना करता येते.

छतावर किंवा गच्चीत पाणी साठविण्याची सोय केलेली असते. यामुळे घर दिवसा थंड तर रात्री गरम राहते. बाहेरच्या बाजूस सावली देणारी झाडे असणे फायदेशीर असते. पडदे, व्हरांडा, उतरते छप्पर यांचीही सूर्यप्रकाश रोखण्याचे उपाय नैसर्गिक वायुवीजनाचा दुहेरी फायदा होतो. त्यामुळे गारवा येतो व घरातील बांधकाम घटकही थंड होतात.

घराचे सूर्याच्या उष्णतेपासून संरक्षण करणे व त्याचवेळी घरातील प्रकाशाची गरज भागविण्यासाठी सूर्यप्रकाशाचा जास्तीतजास्त उपयोग करणे हे उद्दीष्ट ठेऊन घराचे डिझाईन करावे लागते.

नैसर्गिक वायुवीजन
सूर्याच्या उष्णतेने हवा गरम होऊन वर जाते या तत्वाचा वापर करून घराचे डिझाईन केले की नैसर्गिक वायूवीजन होऊन आतील तापमान थंड व सुखकर राहते. घरातल्या फरशीखाली पाणी साठविण्याची सोय केल्यास त्याचीही तापमान थंड ठेवण्यास मदत होते.
इमारतीच्या बाहेरील बाजूच्या भिंती आणि छप्पर वा स्लॅब सूर्याच्या उष्णतेने तापतात व त्याचा परिणाम इमारतीच्या आतल्या तापमानावर होतो. त्यामुळे बाहेरील बाजूस पडवी वा व्हरांडा ठेवल्यास भिंतीवर ऊन पडत नाही. पडदे, उष्णतारोधक काचा यांचा उपयोग करूनही आत येणारी उष्णता थोपविता येते. स्लॅब व बाहेरील भिंतीना प्रकाश परावर्तक पांढरा रंग दिल्यास उष्णता शोषली न जाता ६० ते ७० टक्के उष्णतेचे परावर्तन होऊन ती परत वातावरणात सोडली जाते व त्यामुळे आतले तापमान थंड राहण्यास मदत होते. अशी उपाय योजना केल्यास घरातील तापमान २ ते ३ डिग्रींनी कमी होऊ शकते. घरातील शीतकाच्या शीतकरण द्रवाचे बाष्पीभवन करण्यासाठी सूर्यप्रकाशाचा वापर केल्यास शीतकाच्या वीज वापरात बचत होते. १० चौरस मीटर जागेवरील सूर्यप्रकाशाचा उपयोग केल्यास ८ तासात ०.५ ते १.२ टन हवेचे शीतकरण साधता येते.
पर्यावरण पूरक वस्तू
इमारतीसाठी निर्मितीसाठी कमी ऊर्जा लागणार्‍या व पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करावा. बांबू, ज्यूट व कापड यापासून बनविलेल्या वस्तू, उसाच्या बगॅसपासून तयार केलेले तक्ते, उन्हात वाळविलेल्या विटा, प्रीकास्ट सिमेंट कांक्रीट ब्लॉक, तुळया, स्लॅब,सच्छिद्र वा पोकळ कांक्रीटचे ब्लॉक, सिमेंटचा रंग, मातीची कौले, फ्लाय अँशच्या विटा असे अनेक पर्याय यासाठी उपलब्ध आहेत.

हवा प्रदूषण टाळण्यासाठी बाष्पशील सेंद्रीय पदार्थ(व्हीओसी) नसणारे रंग वापरा. पाण्याची ओल व गळतीमुळे बुरशी व जिवाणूंची वाढ होते यासाठी योग्य जलावरोधक वापरावेत. फ्लाय अँश, टाइल्सचे तुकडे व पुनर्वापर करतायेणार्‍या वस्तूंचा बांधकामात वापर करावा.

पर्जन्यजल संकलन ( रेन वाटर हार्वेस्टींग)पाण्याच्या सर्व उपलब्ध स्रोतांमध्ये पावसाचे पाणी सर्वात शुद्ध असते व मोफत मिळू शकते. मात्र ते साठविण्यासाठी व्यवस्था करावी लागते. ढगातून पाणी खाली पडताना हवेतील धूळ व कार्बन डॉय ऑक्साईड वायू या खेरीज या पाण्यात कोणतेही विद्राव्य क्षार वा गढूळपणा नसतो. घराच्या छपरावर वा गच्चीत पडणारे पाणी एकत्र करण्यासाठी पन्हाळी व उभे नळ लावून हे पाणी एकत्र करता येते. पहिल्या पावसाबरोबर येणारे छपरावरील पालापाचोळा व कचरा असलेले पाणी तसेच वाहून जाईल अशी व्यवस्था व नंतर येणारे चांगले पाणी विशिष्ट गाळणीतून स्वच्छ होऊन पाण्याच्या टाकीत जमा होईल अशी व्यवस्था करावी लागते. असे साठविलेले पाणी पिण्यासाठी वापरता येते. घराच्या आवारात, बागेत वा रस्त्यावर पडणारे पाणी गाळून बोअरवेलमध्ये सोडले तर भूजल पुनर्भरण करता येते. यासाठी बोअरवेलच्या सभोवती वाळू व खडीचे थर असणारा फिल्टर तयार करावा.
पाण्याची बचत
घरात वापरावयाच्या पाण्यात बचत केली की पाण्याची बचत होतेच शिवाय व घरातील सांडपाणी कमी तयार होते. यासाठी ड्युएल फ्लश तसेच पाण्याचा प्रवाह आपोआप बंद हॊणारे वॉशबेसिन व पॅरीचे अजिबात पाणी न लागणार्‍या (वाटरलेस) युरिनल वापरल्यास अशी बचत करता येते.

सांडपाणी शुद्धीकरण व पुनर्वापर

सांडपाणी शुद्धीकरणासाठी वाळूचा थर असणारी टाकी बांधली व त्यात पानवनस्पती लावल्या तर सांडपाण्यातील सर्व दूषित द्रव्यांवर प्रक्रिया होऊन सांडपाणी शुद्ध होते व ते बागेसाठी वापरता येते. यामुळे सांडपाणी निचरा करण्याची समस्या रहात नाही.


प्लॅटिनम दर्जाची इमारत
भारतातील पहिली प्लॅटिनम दर्जाची इमारत हैदराबाद येथील सोहराबजी गोदरेज ग्रीन बिझिनेस सेंटर ही आहे. २००० चौ. फूट क्षेत्र असणार्‍या या इमारतीतील ९० ट्क्के क्षेत्रातील खोल्यात सूर्यप्रकाश मिळण्याची व बाहेरचा निसर्ग पाहण्याची सोय आहे. दक्षिणेकडे सोलर पॅनेल वापरून सौरऊर्जेपासून वीज मिळवून इमारतीतील ८८ टक्के विजेची गरज भागवण्यात आली आहे. सांडपाणी प्रक्रियेसाठी पाणवनस्पतीचा उपयोग करून शुद्ध केलेल्या पाण्याचा पुनर्वापर केला आहे. यामुळे पाण्याच्या वापरात ३५ टक्के घट झाली आहे. वाया गेलेल्या फूटक्या काचा, टाईलचे व कौलांचे तुकडे, पुनर्वापरातील कागद व साखर कारखान्यातील बगॅस यांचा वापर बांधकाम साहित्यात केला असून ९६ टक्के बांधकाम साहित्य पुनर्वापरयोग्य आहे. वरच्या भागातील थंड हवा आत घेण्यासाठी विंड टॉवर व पावसाच्या पाण्याचे संकलन करण्यासाठी ८ लाख लिटर क्षमतेचे तळे यांची योजना केली आहे.


आता भारतात अनेक ठिकाणी ग्रीन बिल्डिंग बांधण्यात आल्या असून भारतीय परिस्थितीस अनुकूल असे दर्जा ठरविण्यासाठी निकष तयार करण्यात आले आहेत. भविष्यकाळात सर्व इमारती ग्रीन निकषांना उतरतील असे निर्बंध घालण्याचा शासन विचार करीत आहे. यासाठी बांधकाम व्यावसायिकांनी या तंत्रज्ञानाचा अभ्यास करून इमारती बांधणे आवश्यक आहे.
याविषयी लोकजागृती व प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने ज्ञानदीप एज्युकेशन अँड रिसर्च फौंडेशनने गेल्या चार वर्षांच्या काळात अनेक कार्यसत्रे घेतली असून www.envis.org व www.green-tech.biz ही संकेतस्थळे व ग्रीन टॆक नावाचा एक याहू ग्रुप चालू केला आहे. त्यावर तज्ञांचे लेख तसेच ग्रीन बिल्डिंगविषयी सर्व महत्वाची माहिती देण्यात आली आहे त्याचा सर्व बांधकाम व्यावसायिकांनी फायदा घ्यावा अशी अपेक्षा आहे.

Hits: 75