शुक्राचे अधिक्रमण 6 जून रोजी

संदर्भ - दै. सकाळ २६ मे २०१२ लेखक - डॉ. प्रकाश तुपे
आयुष्यात एक-दोन वेळाच दिसू शकणारी एक दुर्मिळ खगोलीय घटना येत्या 6 जून रोजी घडत आहे. या दिवशी एक आगळे-वेगळे सूर्यग्रहण होत असून, या प्रकारचे ग्रहण 243 वर्षांत अवघे चार वेळा दिसते. या ग्रहणात नेहमीप्रमाणे चंद्राचा सहभाग नसून, शुक्र ग्रह सूर्याला ग्रहण लावत आहे. शुक्राचा आकार फारच छोटा असल्याने तो सूर्याला झाकू शकत नाही. या वेळी शुक्राचा छोटा काळसर ठिपका सूर्यबिंबावर सरकताना दिसतो. या अनोख्या ग्रहणास "अधिक्रमण' (ट्रांझीट) म्हणून ओळखले जाते. शुक्राचे अधिक्रमण यापूर्वी 8 जून 2004 रोजी दिसले होते व येत्या 6 जूनच्या अधिक्रमणानंतर पुढचे अधिक्रमण 11 डिसेंबर 2117 रोजी दिसेल.

पृथ्वीच्या आतील कक्षेतून सूर्यप्रदक्षिणा घालणाऱ्या बुध व शुक्राचीच अधिक्रमणे घडू शकतात. हे अंतर्ग्रह सूर्याभोवती फिरताना जेव्हा पृथ्वीजवळ येतात तेव्हा त्यांची अंतर्युती होते. या काळात सूर्य व पृथ्वी यांच्या बरोबर मध्ये अंतर्ग्रह आल्यास अधिक्रमण घडते. शुक्राची भ्रमणपातळी पृथ्वीच्या भ्रमणपातळीपाशी 3.4 अंशाने कललेली असल्याने प्रत्येक अंतर्युतीच्या वेळी शुक्र बरोबर सूर्य - पृथ्वीपातळीत येत नसल्याने अधिक्रमण घडत नाही. पृथ्वी व शुक्राच्या भ्रमणपातळ्या जेथे एकमेकांना जेथे छेदतात त्यांना "पातबिंदू' म्हणतात. पातबिंदूपाशी शुक्र आल्यावर, त्या वेळी नेमकी अंतर्युती झाल्यास अधिक्रमण घडते. एखादे अधिक्रमण घडले, की लगेच पुढील आठ वर्षांत दुसरे अधिक्रमण घडते व त्यानंतरची पुढची अधिक्रमणाची जोडी शे-सव्वाशे वर्षाने दिसते.

सूर्यबिंबाच्या मानाने ग्रहांचे आकार फारच छोटे दिसत असल्याने दुर्बिणीचा शोध लागेपर्यंत नुसत्या डोळ्याने अधिक्रमण कुणालाच पाहता आले नाही. मात्र, जर्मन खगोलविद केप्लर याने सतराव्या शतकात ग्रहांच्या गतीचे गणित मांडून 1631 मधील बुध-शुक्राच्या अधिक्रमणाची शक्‍यता वर्तविली होती. दुर्दैवाने केप्लरचे यापूर्वीच निधन झाल्याने त्याला ही अधिक्रमणे पाहता आली नाहीत. अधिक्रमण पाहण्याचा पहिला मान फ्रेंच खगोलशास्त्रज्ञ गॅसेंडी यास मिळाला. त्याने बुधाचे अधिक्रमण 7 नोव्हेंबर 1631 मध्ये पाहिले. मात्र, डिसेंबर महिन्यातील शुक्राचे अधिक्रमण रात्र झाल्याने त्यास पाहता आले नाही. केप्लरने जरी शुक्राचे अधिक्रमण नजीकच्या काळात दिसण्याची शक्‍यता वर्तविली नव्हती तरी जेरेमी हॉरॉक्‍स नावाच्या इंग्रजी खगोलशास्त्रज्ञाने शुक्राच्या अधिक्रमणाची शक्‍यता 1639 मध्ये दिसण्याचे अनुमान काढले व त्याला ते दिसले देखील. अधिक्रमणाचे निरीक्षण वेगवेगळ्या ठिकाणांहून करून पृथ्वी-सूर्य अंतर भूमितीच्या साहाय्याने समजू शकेल, असे एडमंड हॅलेने जाहीर केले. पृथ्वी-सूर्य अंतर समजल्यास सौरमंडलाच्या विस्ताराविषयी ठोस कल्पना मांडता येईल, हे ध्यानात आल्याने शुक्राच्या अधिक्रमणाविषयी उत्सुकता निर्माण झाली. हॅलेच्या आयुष्यात शुक्राची अधिक्रमणे घडणार नव्हती; कारण ती 1761 व 1769 मध्ये दिसणार होती. या दोन्ही अधिक्रमणांची निरीक्षणे अनेक शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या ठिकाणांहून करून पृथ्वी-सूर्य अंतर मोजण्याचा प्रयत्न केला. या निरीक्षणासाठी अनेक शास्त्रज्ञांनी हालअपेष्टा सोसून दूरदूरच्या देशात जाऊन निरीक्षणे घेतली. या शास्त्रज्ञांमध्ये भारतात येऊन गेलेला फ्रेंच खगोलविद लेजेंटील फारच दुर्दैवी ठरला. तो शुक्राचे अधिक्रमण पाहण्यासाठी पॉंडिचेरीला आला होता. मात्र, पॉंडिचेरीमध्ये युद्ध चालू असल्याने त्याला अधिक्रमणाची निरीक्षणे घेता आली नाहीत. निराशा झालेल्या लेजेंटीलने पुढचे आठ वर्षांनंतरचे अधिक्रमण पाहण्यासाठी मायदेशी जाणे टाळले. मात्र, 1769 मध्ये घडलेल्या शुक्राच्या अधिक्रमणावेळी ढग आल्याने त्याच्या पदरी पुन्हा निराशा पडली. दु:खी अंत:करणाने तो मायदेशी परतला. परतीच्या बोटीच्या प्रवासात झालेल्या अपघातातून तो कसाबसा वाचला. पॅरिसला पोचल्यावर त्याला मोठा धक्का बसला. कारण 11 वर्षे तो बेपत्ता असल्याने पत्नीने दुसरा विवाह केला होता; तर त्याच्या नातेवाइकांनी त्याला मृत समजून त्याची संपत्ती लाटली होती. दुर्बिणीच्या शोधानंतर अवघ्या सहा वेळा शुक्राची अधिक्रमणे दिसली व त्या वेळी निरीक्षणे घेऊन पृथ्वी-सूर्य अंतर मोजण्याचा प्रयत्न शास्त्रज्ञांनी केला. मात्र, त्यांना हे अंतर अचूकपणे मोजता न आल्याने अधिक्रमणाचा फारसा उपयोग झाला नाही. असे असले तरी नवीन ग्रहांच्या शोधासाठी अधिक्रमणाचे तंत्रच सध्या वापरले जात आहे.

येत्या 6 जून रोजीचे शुक्राचे अधिक्रमण भारतीय वेळेप्रमाणे पहाटे 3 वाजून 40 मिनिटांनी सुरू होईल व सकाळी 10.15 वाजता संपेल. हे अधिक्रमण संपूर्णपणे फक्त अलास्का, हवाई, प्रशांत महासागर, पूर्व ऑस्ट्रेलिया व पूर्व आशियामधून पाहता येईल. युरोप, पूर्व आफ्रिका, दक्षिण आशिया व पश्‍चिम ऑस्ट्रेलियामध्ये अधिक्रमण सुरू झाल्यावर सूर्य उगवेल; तर उत्तर अमेरिकेत अधिक्रमण चालू असताना सूर्यास्त होईल. भारतात व विशेषत: महाराष्ट्रात शुक्र सूर्यबिंबावर पोचल्यावर सूर्योदय होईल व त्यापुढे अर्धे अधिक्रमण आपल्याला पाहता येईल. शुक्राचे बिंब सूर्याचा फक्त 3 टक्के भाग झाकत असल्याने नुसत्या डोळ्याने शुक्राचा काळा ठिपका दिसणे अवघड ठरेल. दुर्बिणीच्या साहाय्याने सूर्याची प्रतिमा कागदावर घेऊन अधिक्रमण पाहावे. कुठल्याही प्रकारच्या दुर्बिणीच्या साहाय्याने सरळ सूर्याकडे पाहिल्यास डोळ्यांना इजा होऊ शकते म्हणून सूर्याकडे थेट पाहणे टाळावे. निसर्गाचा हा दुर्मिळ आविष्कार डोळ्यांची काळजी घेऊन अवश्‍य पाहावा. कारण पुढील 105 वर्षे हा आविष्कार दिसू शकणार नाही.

Hits: 76