वनस्पतींशी संवाद

सौजन्य- सकाळ वृत्तसेवा

आपल्या आजूबाजूला अनेक वनस्पती असतात. त्यांना आपण दररोज येता-जाता पाहतो; पण तुम्ही त्यांना कधी जाणून घ्यायचा प्रयत्न केलाय का? पुस्तकांमधून नाही, तर त्यांच्याशी स्वतः संवाद साधून... तुम्हाला वाटेल असं कसं शक्‍य आहे? आज आपण वनस्पतींनाच प्रश्‍न विचारून त्यांच्याकडून उत्तरे काढून घेऊ आणि त्यांच्याशी बोलू.

आपण आता झाडाचा प्रत्येक भाग बारकाईनी बघुयात आणि खाली दिलेल्या मुद्‌द्‌यांच्या आधारे त्यांचे निरीक्षण करूयात. आपल्या वहीत टिपून ठेवूयात.

झाडाची उंची (अंदाजे)

खोड - रंग, खोडाचा स्पर्श, त्यावर काही वैशिष्ट्यपूर्ण रचना आहे का? उदा. ठिपके, रेषा, डाग इत्यादी.
पान - स्पर्श - रखरखीत, मऊ, ओबडधोबड इ. आकार, पान किती मोठे आहे? पान चुरगाळल्यानंतर वास येतो का? पानाच्या वरच्या आणि खालच्या बाजूत काय फरक आहे? अन्य काही
फूल - झाडावर कळ्या आहेत का? फुले आहेत का? असल्यास किती? रंग, वास, फूल एकटे आहे की गुच्छात आहे? आकार उदा. गोलाकार, नरसाळ्यासारखे इत्यादी
फळ - झाडावर फळे आहेत का? असल्यास पिकलेली आहेत का कच्ची? फळे कशी आहेत? उदा. शेंगा, मोठे स्वतंत्र रसाळ, एक बी असलेले, अनेक बीया असलेले इत्यादी.
वरची सगळी निरीक्षणे एकत्र केल्यानंतर झाड आपल्याशी आपोआप बोलायला लागले आहे, हे आपल्याला नक्कीच लक्षात येईल!
- आदित्य पोंक्षे, नचिकेत नित्सुरे
-------------------------------------------------------
झाडांची पानं हिरवी का असतात?

बाबांनी आज झाडं लावायचा कार्यक्रम हाती घेतला होता. चिंपू-पिंकू त्यांना मदत करत होती. हे तिघं काही काम करणार म्हणजे आईची डोकेदुखी वाढणं साहजिकच होतं. चिखल, चिंपूच्या कवायतींमुळे फुटलेल्या कुंड्यांची खापरं, गवत अशा छान वातावरणात कार्यक्रम रंगला होता.

""बाबा, हे झाड मी लावणार हं,'' असं म्हणत चिंपूनं एक छान फुलं असलेलं झाड हातात घेतलं.
""वॉव, किती मस्त फुलं आहेत ना?'' पिंकू ओरडली.
""हो, आणि ही पानं बघ. किती हिरवीगार आहेत,'' बाबा एका पानाला कुरवाळत म्हणाले.
""पण बाबा, झाडांची पानं नेहमी हिरवीच का असतात हो?'' चिंपूनं प्रश्‍न विचारला.

""अरे, झाडांच्या पानांमध्ये क्‍लोरोफिल नावाचा एक घटक असतो. त्याच्यामुळे पानांना हा हिरवा रंग येतो. हा घटक प्रकाशसंश्‍लेषण प्रक्रियेसाठी आवश्‍यक असतो. अगदी सोप्या शब्दांत सांगायचं तर झाडांना त्यांचा खाऊ तयार करण्यासाठी हा घटक मदत करतो. सूर्याचा प्रकाश आणि पाणी यांचा वापर करून झाडं आपला खाऊ तयार करतात. अर्थात पानांमध्ये फक्त क्‍लोरोफिलच नसतं बरंका. इतर घटकसुद्धा असतात. त्यांच्यामुळे झाडांची पानं कधी लाल, निळी अशीसुद्धा दिसतात,'' बाबांनी खास "वैज्ञानिक स्टाइल' उत्तर दिलं.
""काय भारी आहे ना, स्वतःचा खाऊ स्वतःच तयार करायचा,'' पिंकू म्हणाली.

""हो मॅडम; पण तुमचा खाऊ जो मी तयार केलाय ना, तो आता गार होत आलाय. चला बरं आधी बाथरूममध्ये अंघोळी करा. मी मस्त इडली केली आहे,'' आई आतून ओरडली.

""बरं झालं बाबा, आपण झाड नाही ते. नाही तर आपल्याला इडली स्वतःच करायला लागली असती ना,'' चिंपू म्हणाला आणि सगळ्यांनीच हसून दाद दिली.
- मंदार कुलकर्णी

Hits: 61