भारतीय विज्ञान परंपरा भाग - १

परंपरेची पार्श्वभूमि :
परंपरासातत्य हें भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य म्हणून निर्देश करतां येईल. या वैशिष्य्यामुळेंच ती आजतागायत टिकून राहिली आहे.

भारतीयांचा पिंड हा गतानुगतिकतेचा भोक्ता व परंपरेचा अभिमानी असल्याने आचाराविचारादि व्यवहारातील सातत्य टिकून राहिलें, आणि त्यांचा निकटवर्ती देशांत प्रसारहि झाला. निसर, बॅथिलोनिया, ग्रीक, रोम या संस्कृति कालाच्या प्रवाहांत विलिन झाल्या, पण भारतावर अनेक विध्वंसक रानटी मानवसमूहांनी निरनिराळया काळीं अनेक आक्रमणें केलीं, पण त्या मानवसमूहाला भारतीय संस्कृतीने त्यांच्या आक्रमणांसह आपल्यांत सामावून घेतलें, व आपलें अखंडित जीवन कायम राखलें. या संस्कृतीची परंपरा अद्यापहि भारतीयांचें जीवन घडवीत आहे. तिनें निर्माण केलेले नैतिक व वैचारिक आदर्श भारतीय जीवनांत अजूनहि प्रभावी आहेत. जगांतील विविध देशंात मानवी संस्कृतीचा स्फुलिंग निर्माण झाला आणि त्यानें कांही काळ तेथील वातावरण उजळून टाकलें, पण नंतर त्या संस्कृति नष्ट झाल्या. भारतीय संस्कृतीचा झेंडा मात्र अजूनहि डौलाने फडकत आहे आणि म्हणूनच ती `सनातन संस्कृति' आहे.

भारताची शिक्षणपध्दति ही भारताच्या इतिहासाच्या इतकीच पुरातन आहे, आणि भारताच्या संस्कृतीची ती एक घटक बनून राहिली आहे. शिक्षणाचा आद्य हेतु मानवाला जीवन जगण्यासाठी सिध्द करावयाचें, त्याचें जीवन संपूर्णतया समृध्द करावयाचें, त्या दृष्टीने या पध्दतीनें जसा चिंतनशील असा साधुपुरूष निमॉण केला, तसाच बाह्व जगाचीं कोडीं आपल्या तैलबुध्दीने उलगडणारा संशोधकहि निर्माण केला. त्याकरितां अनेक शिक्षणकेंद्रे स्थापन झालीं होतीं. त्यांत ज्ञानविज्ञानाची उपासदा हेंच एक शिक्षणाचें ध्येय नसून ज्ञानप्राप्तीबरोबरच विद्यार्थी चारित्र्यवान् आणि नीतिवान् कसा निर्माण होईल याचीहि काळजी घेतली जाई. घरी किंवा शहरामध्यें शिक्षणाला अनुकूल वातावरण मिळूं शकत नाहीं म्हणून भारतीय शिक्षणकेंद्रे आश्रम, गुरूकुल व विद्यापीठें अशा स्वरूपाची असून तीं शहरापासून दूर असत.

भारतीय आचार्य हे साधी राहणी व उच्च विचारसरणी असा जीवनादर्श ठेवून बाणेदारपणें आपलें स्वातंत्र्य अबाधित राखीत. व्यावसायिक शिक्षण देण्याच्या स्वतंत्र संस्था नव्हत्या व त्यांची गरजहि भासत नसें. वंशपरंपरागत व्यवसाय चालत असल्याने प्रत्येक धंद्यातील कसब नवीन पिढीला जुन्या पिढीकडून घरच्या घरींच मिळूं शकत असे. एकच कुटुंबपध्दतीचाहि या कामीं चांगला उपयोग होई. पुष्कळशा धंद्यांमध्ये दुसऱ्या कसबी कारागिराच्या हाताखाली उमेदवारी करून व्यवसायाचें ज्ञान मिळे. चवथ्या शतकापर्यंत जगांतील पहिल्यावहिल्या विद्यापीठाचें तक्षशिला विद्यापीठाचें १२०० वर्षे अखंड ज्ञानसूत्र चाललें होते. व्याकरणकार पाणिनी, राजधुरंधर चाणक्य (कौटिल्य), राजवैद्य जीवक आणि अनेक चतुरस्त्र विव्दान या विद्यापीठांत शिकून बाहेर पडले. पण त्या काळांतील हूणांच्या टोळघाडीनें ते विद्यापीठ विनाश पावलें. त्याची जागा पहिल्या कुमारवर्धनाने स्थापन केलेल्या महान् नालंदा विद्यापीठानें आणि मैत्रक राजांचा उदार आश्रय मिळालेल्या काठेवाडांतील वल्लभी या विद्यापीठांनें घेतली. नालंदा विद्यापीठाचा पहिला कुलगुरू शीलभद्र असून वल्लभी विद्यापीठांत गुरमति व स्थिरमति हे विव्दान् कुलगुरू होऊन गेले. त्याशिवाय काशी, अयोध्या, उज्जयनी नाशिक, प्रतिष्ठान, कांची येथेंहि लहान मोठी विद्यापीठें स्थापन झालेलीं होती.

लेखनकलेची चांगलीच वाढ झाली होती; वायव्य भारतांत खरोष्ट्नी लिपि प्रचलित असून इतरत्र ब्राह्मी लिपि वापरली जाई. संस्कृत भाषा उच्च वर्णीयांमध्ये बोलली जाई. शिवाय विविध प्राकृत भाषाहि बोलल्या जात होत्या. या कालांत इतकें विपुल वाङ्मय निर्माण झालें कीं, त्यांत जीवनाचें कुठलेंहि क्षेत्र हाताळलेलें नाही असें झालें नाही. भास, कालिदास, भवभूति, बाणभट्ट, भर्तृहरि यांच्या नाट्यकृतींतील व साहित्यांतील कल्पनाविलास आणि भावनांचे हळुवार केलेलें रेखाटन अपूर्व आहे. कौटिल्याचें `अर्थशास्त्र' म्हणजे एक विश्वकोशच आहे.

प्रजासुखे सुखं राज्ञ: प्रजानां च हिते हितम् ।
तात्मप्रियं हितं राज्ञ: प्रजानां च प्रियं हितम् ।।

असा शुध्द लोकशाहीचा सिध्दान्त त्यांत मांडला आहे. त्याच ग्रंथांत स्थितबंत्र, चलयंत्र वगैरे ३६ हत्यारांची यादी दिली असून, शत्रूच्या किल्ल्यांस आग लावण्याकरितां जळत्या काठ्या फेकणाऱ्या `संधाटी' ची नोंद केलेली आहे. `अर्थशास्त्र' या ग्रंथात तत्कालीन राजकीय व सामाजिक जीवनांचे यथार्थ दर्शन घडविलें आहे. कुमारिलभट्टानें सुरू केलेलें वैदिक धर्माच्या पुनरूज्जीवनाचें कार्य शंकराचार्यानी (७८८-८२०) पुरें केलें. उपनिषदें, भगवद्गीता, वेदान्तसूथें यांवर सुबोध व ओजस्व भाषेंत भाष्य, ग्रंथ लिहिले आणि भावनेला न रूचणाऱ्या पण बुध्दीला पटणाऱ्या अव्दैत मताची स्थापना केली. त्यानंतर वाचत्पतिमिश्र हे षड्दर्शनावर महान् भाष्यकार होऊन गेले.

अशा या सनातन संस्कृतीमधील वर्णव्यवस्था ही श्रमविभागणी, सहकार्य व सहजीवन या तत्वांवर आधारलेली होती. तिला पुढें पुढें विस्कळीत स्वरूप प्राप्त झालें. त्यांत अनेक दोष उत्पन्न झाले. आत्यंतिक व्यक्तिस्वातंत्र्य व आत्यंतिक समाजनियंत्रण यांचा चो सुवर्णमध्य त्या वर्णव्यवस्थंेत साधला होता, तो विचलित झाला. त्यामुळें कोणत्याहि क्षेत्रांत नवीन धाडस, नवीनं व्यवसाय, नवीन सुधारलेली जीवनपध्दति अनुसरणें अशक्य झालें. आणि याचा परिणाम ज्ञानविज्ञानाच्या जोपासनेकरितां उपयुक्त असा हव्यास, निदिध्यास, सखोल निरीक्षण, प्रयत्नांची शिकस्त या गोष्टी हळूहळू लवाला जाऊं लागल्या, व नुसता गतानुगतिकतेचा संस्कार शिल्लक राहिला. तरी जीं कांही हाताच्या बोटावर मोजण्याइतकीं विव्दद्रत्नें बाराव्या शतकापर्यंत चमकून गेलीं त्यांनी जागतिक विज्ञानविकासांत अपूर्व अशी भर टाकली, हें विसरून चालणार नाहीं.

Hits: 66